Breaking News | पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! ओमकार शेलार प्रकरणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा एल्गार! - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

Breaking News | पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! ओमकार शेलार प्रकरणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा एल्गार!

पत्रकार ओमकार शेलार यांच्यावरील कथित हल्ला, अपहरण व धमकी प्रकरणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आक्रमक; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी!


पुणे माझा न्युज | प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील केडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्रकार ओमकार राजेंद्र शेलार यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ला, अपहरण आणि धमकावण्याच्या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


मिळालेल्या तक्रारीनुसार, केडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायासंदर्भात तसेच बांगलादेशी महिलांबाबत माहिती घेण्यासाठी पत्रकार ओमकार शेलार गेले असता, हॉटेल चालक अजित शेट्टी व त्याच्या साथीदारांनी त्यांना मारहाण केल्याचा, त्यांचे अपहरण केल्याचा तसेच बातमी आणि व्हिडिओ पुरावे नष्ट करण्यासाठी दबाव आणून खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या प्रकरणात केडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक किशोर बाधज, पोलीस निरीक्षक तासगावकर आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तक्रारीनंतरही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत, या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता संघटनेने व्यक्त केली आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या प्रमुख मागण्या

  • पत्रकार ओमकार शेलार यांच्यावरील कथित हल्ला, अपहरण व धमकी प्रकरणात अजित शेट्टी आणि संबंधित साथीदारांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करावी.
  • संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास त्यांच्यावर निलंबनासह कठोर विभागीय व कायदेशीर कारवाई करावी.
  • पीडित पत्रकार ओमकार शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा विचार करून आवश्यक पोलीस संरक्षण पुरवावे.
  • प्रकरणातील उपलब्ध व्हिडिओ, डिजिटल पुरावे आणि इतर संबंधित पुराव्यांचे संरक्षण करून निष्पक्ष तपास सुनिश्चित करावा.


पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, जनहिताच्या प्रश्नांवर काम करताना पत्रकारांवर हल्ले होणे किंवा त्यांना धमकावले जाणे ही गंभीर बाब आहे. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भूमिका ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने मांडली आहे.

या प्रकरणात तातडीने आणि निष्पक्ष कारवाई  न झाल्यास संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad