- कोंढवा हाताबाहेर जाण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? गुन्हेगार बिनधास्त, नागरिक त्रस्त; कोंढवा पोलीस ठाण्यावर वाढता भार!
- कोंढव्यात वाढती गुन्हेगारी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी: पुणे शहरातील कोंढवा परिसर हा अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. मागील काही दिवसांपासून या परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार, कोंढवा पोलीस ठाण्यावर सध्या अपुऱ्या मनुष्यबळाचा मोठा ताण असून त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होताना दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी कोंढवा परिसरात दोन गटांमध्ये तुफान मारामारी झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेचे पडसाद इतर परिसरातही उमटले असून बाहेरील व्यक्ती मोठ्या संख्येने परिसरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परिस्थिती अधिक गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मात्र, आजही परिसरातील परिस्थिती चिंताजनक असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.विशेषतः महिला वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून अनेक नागरिक भीतीच्या वातावरणात जीवन जगत असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे कोंढवा पोलीस ठाण्यास तातडीने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणता येईल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा