खंडणी, धमकावणे, मारहाण अन् शासकीय कामात अडथळा; पाचगणी पोलिसांच्या प्रस्तावावर प्रशासनाची कठोर कारवाई!
पुणे माझा न्युज । सातारा प्रतिनिधी: खंडणी मागणे, नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे आणि शासकीय कामात अडथळे निर्माण करून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आता सातारा पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवला आहे. पाचगणी परिसरात गुन्हेगारी कारवायांमुळे चर्चेत असलेल्या अनमोल कांबळे याला तब्बल दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पाचगणी पोलिसांनी सादर केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सन २०२० ते २०२६ या कालावधीत संबंधित व्यक्तीविरुद्ध खंडणी, धमकावणे, मारहाण, शासकीय कामात अडथळा आणणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे हद्दपारीच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. हॉटेल आणि इमारतींच्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावून पैशांची मागणी करणे, नागरिकांना दहशतीखाली ठेवणे आणि कायद्याला न जुमानता मनमानी कारभार करणे, अशा तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली.
नागरिकांकडून मिळालेली गोपनीय माहिती, दाखल गुन्हे आणि संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीचा आढावा घेत पाचगणी पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१)(अ)(ब) अन्वये हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. अखेर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आदेश क्रमांक एमजी/हद्दपार/एसआर ०२/२०२५ अन्वये अनमोल कांबळे याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सांळुखे यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्पष्ट इशारा दिला आहे. खंडणी, धमकावणे आणि दहशतीचा काळ आता संपला आहे. कायद्याला डोळे दाखवणाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांना सातारा जिल्ह्यात थारा नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला.
या कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पाचगणी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
एकूणच, पाचगणीतील या हद्दपारीच्या कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला असून, सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा