मनपाचा हातोडा की बुलडोझरची चेतावणी ? नाना पेठेतील कथित अनधिकृत बांधकामाचा भांडाफोड; बुलडोझरची टांगती तलवार
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी पुणे : पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाने पुण्यातील कोंढवा आणि नाना पेठ परिसरातील मालमत्तेवरील कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई सुरू केली असून, ताबाधारक अनीस रशीद सुंडके व रईस रशीद सुंडके यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सदर नोटीसमध्ये संबंधित बांधकामाबाबत स्पष्टीकरण सादर करण्यास तसेच अनधिकृत बांधकाम हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या नोंदीनुसार, संबंधित मालमत्तेवर मंजूर नकाशाच्या विरुद्ध अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. बांधकाम विकास विभागाने केलेल्या पाहणीत इमारतीच्या मागील बाजूस अतिरिक्त क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात आल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. सदर बांधकाम प्रथमदर्शनी अनधिकृत असल्याचे महानगरपालिकेचे मत आहे.
महानगरपालिकेने यापूर्वीही संबंधित ताबाधारकांना नोटीस देऊन खुलासा सादर करण्याची संधी दिली होती. मात्र, निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
नोटीसमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, संबंधितांनी ठराविक कालावधीत स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटविले नाही तर पुणे महानगरपालिका स्वतः कारवाई करून सदर बांधकाम पाडू शकते. तसेच या कारवाईवर होणारा खर्च संबंधित ताबाधारकांकडून वसूल करण्यात येऊ शकतो.
याशिवाय, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार आवश्यक असल्यास पोलिस मदतीनेही कारवाई केली जाऊ शकते, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, शहरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगरपालिका सध्या कठोर भूमिका घेत असून नियमबाह्य बांधकामांविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
दरम्यान, या नोटीसबाबत सुंडके कुटुंबीयांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. प्रकरणातील पुढील घडामोडींवर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा