Breaking News | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! दबाव टाकणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

Breaking News | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! दबाव टाकणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई

  


पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! दबाव टाकणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई”

“सोशल मीडिया गैरवापरावर PMCचा बडगा – खोडसाळांवर गुन्हे दाखल होणार!”

“अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्यांना इशारा – पुणे महापालिका अॅक्शन मोडमध्ये”


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी: पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे की, काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांकडून महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत अयोग्य वर्तन, अनुचित दबाव तंत्र तसेच सोशल मीडियाचा गैरवापर केल्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी मा. आयुक्तांना निवेदन सादर करून या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले आहे.


सदर निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार वैयक्तिक तक्रारी संबंधित व्यक्तीकडूनच स्वीकारण्याची तरतूद असून, तृतीय पक्षामार्फत येणाऱ्या तक्रारी ग्राह्य धरल्या जाऊ नयेत. तथापि, काही व्यक्तींकडून या नियमांचे उल्लंघन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनावश्यक दबाव टाकला जात आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अपूर्ण, चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रकारही आढळून आले आहेत.


या संदर्भात मा. आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले असून, अशा खोडसाळ व बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल तसेच भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येतील. तसेच सार्वजनिक सेवकांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना देण्यात येणार आहेत.


महानगरपालिकेच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या किंवा गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार महानगरपालिका कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी करण्याबाबतही कायदेशीर पावले उचलली जातील.


तथापि, पुणे महानगरपालिका नागरिकांच्या वैध व कायदेशीर तक्रारींचे स्वागत करते व त्या तक्रारींवर नियमानुसार कार्यवाही करण्यास कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीही हमी प्रशासन देत आहे.


महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षित व निर्भय वातावरणात कार्य करण्याचा अधिकार आहे. या दृष्टीने प्रशासन आवश्यक ती सर्व कायदेशीर व प्रशासकीय उपाययोजना तातडीने राबविणार आहे.


— पुणे महानगरपालिका प्रशासन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad