“जुगार, हफ्ते आणि गुंडगिरीचा खेळ: पिंपरी चिंचवडमध्ये कायद्याला आव्हान?”
“तक्रारी असूनही कारवाई शून्य – म्हाळुंगे परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट!”
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी: म्हाळुंगे (दक्षिण) पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या MIDC परिसरात सध्या अवैध जुगार, मटका, दारू विक्री व इतर बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शिवदास पवार नामक व्यक्ती हा ‘लाल-पिवळा’ जुगार उघडपणे चालवत असून, स्वतःजवळ प्रेस आयडी कार्ड बाळगून कायद्यापासून बचाव करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होण्याआधीच संबंधित व्यक्तीस माहिती मिळत असल्याने, हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या संगनमताने सुरू असल्याचा संशय अधिक बळावत आहे.
स्थानिक कामगार व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असून, या जुगार अड्ड्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत आहे. यासोबतच संबंधित व्यक्तीकडून पोलिसांना आर्थिक लाभ (हफ्ता) दिला जात असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, शिवदास पवार याच्यावर गुंडगिरीचे आरोप देखील करण्यात येत आहेत. तळेगाव टोल नाक्याजवळ, रात्री उशिरा, काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे.
सदर घटनेमध्ये गणेश इंगळे यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांच्या मूळ गावी सोलापूर येथे पाठविण्यात आले. तसेच, त्याच घटनेत दत्त घाडगे यांनाही धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर संबंधित जखमी व्यक्तींना पवन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या वेळी शिरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन जबाब नोंदविल्याची माहिती आहे.
तथापि, एवढ्या गंभीर स्वरूपाच्या घटनेनंतरही कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर प्रकरण जाणीवपूर्वक दडपण्यात आल्याचा आरोप होत असून, यामागे मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे
शिवदास पवार याचा प्रभाव पोलीस प्रशासनातील उच्च स्तरापर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यामुळेच त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसरातील नागरिकांच्या मागण्या आहेत
▪️ संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी
▪️ संबंधित आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा
▪️ अवैध जुगार व सर्व बेकायदेशीर धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत
▪️ पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी
▪️ संबंधित व्यक्तीस हद्दपार करण्यात यावे
या गुंडवृत्तीच्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा