Nashik News | सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अवैध ‘लाल-काला’ जुगाराचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा गंभीर सवाल - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 9 May 2026

Nashik News | सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अवैध ‘लाल-काला’ जुगाराचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा गंभीर सवाल

 सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अवैध ‘लाल-काला’ जुगाराचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा गंभीर सवाल

पुणे माझा न्युज । प्रतिनिधी नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीला प्रशासनाने गती दिली असताना दुसरीकडे भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या अवैध धंद्यांनी नाशिक शहरात डोके वर काढल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत असताना त्याचाच गैरफायदा घेत भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत द्वारका सर्कल सर्व्हिस रोड परिसरात खुलेआम अवैध “लाल-काला” जुगार सुरु असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

सदर अवैध जुगार मनाली ट्रॅव्हल्स समोर, द्वारका सर्कल, नाशिक येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असून फिरोज इस्कल हा आपल्या 15 ते 20 साथीदारांसह हा बेकायदेशीर धंदा चालवत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे, धार्मिक वातावरणाचा फायदा घेत काही जण स्वतःची खरी ओळख लपवून हिंदू नावांचा वापर करत भाविकांची फसवणूक व आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या अवैध जुगारातून दररोज अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांची बेकायदेशीर उलाढाल होत असून अनेक गरीब कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या संदर्भात भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. उलट या अवैध जुगार धंद्याला काही पोलीस अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याची चर्चा परिसरात सुरू असून त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.


नागरिकांनी असा आरोप केला आहे की, कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू राहिल्यास भविष्यात मोठी कायदा व सुव्यवस्थेची घटना घडू शकते. त्यामुळे संबंधित अवैध जुगार धंद्यावर तात्काळ छापेमार कारवाई करून संबंधित आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

“कुंभमेळ्याच्या तयारीत प्रशासन व्यस्त, पण भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?” — असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Top Ad