Unauthorized Construction at Kalepadal Police Station Exposed | काळेपडळ पोलीस ठाण्यातील अनधिकृत बांधकामाचा भांडाफोड; पत्रकार रियाज मुल्ला यांचा खळबळजनक खुलासा - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 5 September 2025

Unauthorized Construction at Kalepadal Police Station Exposed | काळेपडळ पोलीस ठाण्यातील अनधिकृत बांधकामाचा भांडाफोड; पत्रकार रियाज मुल्ला यांचा खळबळजनक खुलासा

काळेपडळ पोलीस ठाण्यातील अनधिकृत बांधकामाचा भांडाफोड; पत्रकार रियाज मुल्ला यांचा खळबळजनक खुलासा


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे, ५ सप्टेंबर २०२५: हडपसरमधील काळेपडळ पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाचा मोठा भांडाफोड पत्रकार रियाज मुल्ला यांनी केला आहे. माहितीचा अधिकार कायदा २००५ अंतर्गत (आरटीआय) मागवलेल्या माहितीवरून हे प्रकरण उघडकीस आले आहे. पुणे महानगरपालिकेकडे या बांधकामाची कोणतीही नोंद नसल्याचे समोर आले असून, याला परवानगी कोणी दिली आणि निधी कोणत्या स्रोतातून प्राप्त झाला, याबाबत गूढ कायम आहे. मुल्ला यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


तरवडे वस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर येथील काळेपडळ पोलीस ठाण्यात विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती मुल्ला यांनी उजागर केली आहे. मात्र, पुणे महानगरपालिकेच्या नोंदीनुसार या बांधकामाला कोणतीही अधिकृत परवानगी मिळालेली नाही. "सामान्य नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केल्यास पालिका तातडीने कारवाई करून ते उद्ध्वस्त करते. परंतु, सरकारी कर्मचारी / अधिकारी कार्यालयातच जर नियम व कायदा धाब्यावर बसवला जात असेल, तर ही दुहेरी नीती का?" असा संतप्त सवाल मुल्ला यांनी उपस्थित केला आहे.

या बांधकामासाठी कोणत्या कंत्राटदार किंवा एजन्सीमार्फत काम सुरू आहे, याची माहिती लपवली जात असल्याचा गंभीर आरोप मुल्ला यांनी केला आहे. तसेच, या बांधकामासाठी लागणारा निधी कोणत्या स्रोतातून उभारला गेला, याबाबत पोलीस आयुक्तालयाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. "या प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव आहे. गरज पडल्यास यासाठी न्यायालयात जाण्यास मागेपुढे पाहणार नाही," असे मुल्ला यांनी ठामपणे सांगितले आहे.

पालिकेच्या उत्तरातून हे स्पष्ट झाले आहे की, या बांधकामाची कोणतीही अधिकृत नोंद नाही. त्यामुळे या अनधिकृत कामाला परवानगी देणाऱ्या जबाबदार व्यक्ती आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांची चौकशी होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणाने सरकारी यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पोलीस आयुक्तालयाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

या खुलाशाने पुण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, येत्या काही दिवसांत याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad