निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यात राजकीय भूकंप! माजी नगरसेवकांच्या निकटवर्तीयाचा काँग्रेसमध्ये धडक प्रवेश
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे, दि. २१ डिसेंबर २०२५ – पुणे महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकारणात खळबळ माजली आहे. विशेषतः कोंढवा परिसराकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागलेले असतानाच एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कोंढवा भागातील तीन माजी नगरसेवकांच्या कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रभावशाली नेते इम्तियाज शेख यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपली साथ सोडत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
इम्तियाज शेख यांचा हा अचानक पक्षप्रवेश कोंढवा भागात एकच खळबळ उडवून देणारा ठरला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इम्तियाज शेख हे यापूर्वी तीन माजी नगरसेवकांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जायचे, मात्र आता त्यांनी काँग्रेसच्या छत्रछायेखाली येऊन नवे वळण घेतले आहे. यामुळे संबंधित माजी नगरसेवकांच्या राजकीय ताकदीवर मोठा परिणाम होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नेमका किती फटका बसेल, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, इम्तियाज शेख यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी स्वतंत्र आणि आक्रमक रणनीती आखली आहे. कोंढवा परिसरातील जनतेच्या मूलभूत समस्या, विकासकामे आणि स्थानिक मुद्द्यांवर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे समजते. त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला कोंढवा भागात नवीन ऊर्जा आणि बळ मिळणार असून, निवडणुकीत पक्षाची स्थिती अधिक मजबूत होण्याचे संकेत आहेत.
कोंढवा राजकारणात आणखी मोठे बदल आणि उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इम्तियाज शेख यांच्या प्रवेशाने निर्माण झालेल्या या राजकीय भूकंपाचा परिणाम पुणे महापालिका निवडणुकीवर नक्कीच दिसून येईल.


No comments:
Post a Comment