काळेपडळ पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीचे आदेश; उच्च न्यायालयाचे पुणे पोलीस आयुक्तांना पत्र
रियाज मुल्ला पत्रकार यांच्या तक्रारीनंतर काळेपडळ पोलीस ठाण्याची चौकशी
पुणे माझा न्युज | प्रतिनिधी :
दि. २३ डिसेंबर २०२५ : पुणे शहरातील काळेपाडळ पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार, मनमानी कारभार तसेच टीपू पठाण गिरोहाशी संशयास्पद संबंध असल्याच्या गंभीर आरोपांची चौकशी सुरू झाली आहे. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रियाज मुल्ला यांनी दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत काळेपाडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तसेच इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, “सेटलमेंट”च्या नावाखाली अवैध आर्थिक वसुली करणे, टीपू पठाण गिरोहाशी साटेलोटे ठेवणे आणि मुख्य आरोपींना गुन्हयात सामील न करण्यासाठी लाखों रुपयांची आर्थिक देवाणघेवाण केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
रियाज मुल्ला यांच्या तक्रारीनुसार, ठाण्यातील अवैध बांधकामासाठी 'सेटलमेंट'मधून मिळालेल्या अवैध पैशांचा वापर होत असून, हे संपूर्ण प्रकरण मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत येते. यासंदर्भात त्यांनी प्रवर्तन संचालनालयाने (ED) स्वतंत्र चौकशी करावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या व संशयित व्यक्तींच्या बँक खात्यांची तपासणी करावी तसेच अवैध बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या निधीचा माग काढावा, अशी मागणी केली आहे.
या तक्रारीसोबत पुणे महानगरपालिकेकडून आरटीआयद्वारे प्राप्त केलेल्या अवैध बांधकामांच्या कागदपत्रांच्या प्रती देखील सादर करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणामुळे कृष्णानगर, मोहम्मद वाडी, सय्यद नगर आदी परिसरांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. मागील काही महिन्यांत टीपू पठाण गिरोहाविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे हे राजकीय किंवा वैयक्तिक हितसंबंधातून केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना तात्काळ व आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण अधिक गंभीर व संवेदनशील बनले असून, ED कडून स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, रियाज मुल्ला यांनी सर्व पुराव्यांसह लवकरच पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे या आरोपांची कितपत गांभीर्याने दखल घेतात व त्यानुसार अंतर्गत चौकशी सुरू करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे पोलीस दलाच्या पारदर्शकतेवर व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील सुनावणी व चौकशीच्या निष्कर्षाकडे नागरिक, सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे लक्ष ठेवून आहेत.



No comments:
Post a Comment