कोंढवा, कौसरबाग, पुणे येथील ब्रह्मा मल्टीकॉनच्या मालमत्तेवर गाव गुंडांकडून जागा बळकावण्याचा प्रयत्न
पुणे माझा न्युज ।प्रतिनिधी : पुण्यातील कोंढवा, कौसरबाग परिसरात एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. ब्रह्मा काउंटी जवळील सर्वे क्रमांक 31 येथील ब्रह्मा मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेवर काही अज्ञात त्रयस्थांनी जबरदस्तीने शिरकाव करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत मालमत्तेचे नुकसान झाले असून, सुरक्षा रक्षकावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ब्रह्मा मल्टीकॉनच्या वकिलांनी दिली सविस्तर माहिती:
पुण्यातील कौसरबाग येथील सर्वे क्रमांक 31 वर असलेली ही मालमत्ता ब्रह्मा मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. कंपनीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेसंबंधी सर्व वैध कागदपत्रे, सातबारा आणि इतर दस्तऐवज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मात्र, काही गावगुंडांनी या मालमत्तेवर अनधिकृतरित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी धारदार शस्त्रे, कोयते आणि पालघन यांसारखी हत्यारे ठेवली आणि काही दिवसांपूर्वी या जागेवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जखमी केले होते.
"ही मालमत्ता आमच्या कंपनीच्या मालकीची आहे आणि यासंबंधी सर्व कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे आहेत. त्रयस्थांनी कोणतेही वैध दस्तऐवज सादर न करता, जबरदस्तीने शिरकाव करून मालमत्तेचे नुकसान केले आहे. यामुळे आमच्या पक्षकारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही पोलिसांकडे एफआयआर दाखल केली आहे, पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही."

ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकिलांनी सांगितले की, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, कामकाजात अडथळे निर्माण झाल्याने जागेवर कोणी उपस्थित नसताना या त्रयस्थांनी याचा गैरफायदा घेतला. या प्रकरणी त्यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे तात्काळ हस्तक्षेप करून अनधिकृत कब्जा हटवण्याची आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु पोलिसांनी यामध्ये कसलाही हस्तक्षेप केला नाही
पोलिसांचा प्रतिसाद:
या प्रकरणी पत्रकारांनी स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुन्हे श्री. जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला आणि त्या ठिकाणाहून निघून गेले.

या घटनेमुळे कौसरबाग परिसरात तणावाचे वातावरण आहे. ब्रह्मा मल्टीकॉनने पोलिस आणि प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून, या प्रकरणी पुढील तपास काय दिशा घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्कात रहा.
No comments:
Post a Comment