Pune Police Raids On Gambling | वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! गुन्हे शाखेकडून 51 जणांवर कारवाई - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 12 July 2023

Pune Police Raids On Gambling | वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! गुन्हे शाखेकडून 51 जणांवर कारवाई

वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्दे सुळसुळाट ! गुन्हे शाखेकडून 3 जुगार अड्डयांवर छापे, 51 जणांवर कारवाई

 

पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्दे बोकाळल्याचे चित्र समोर आले आहे. गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाने वानवडी आणि हडपसर परिसरातील 3 जुगार अड्डयांवर छापे टाकून तब्बल 51 जणांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी अनुक्रमे वानवडी पोलिस ठाण्यात 1 आणि हडपसर पोलिस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अवैध धंद्यांवरील या कारवाईमुळे संपुर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे तर अवैध धंद्यांना अभय देणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या काही दिवसांपासुन वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्यात अवैध धंद्दे खुलेआम सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजत सुरू होती. हद्दीत नेमकं कोण अवैध धंद्यांना ‘अभय’ देतंय याबाबतची माहिती देखील अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांपर्यंत पोहचल्याचे बोलले जात आहे. अशातच सोमवारी (दि. 10) हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोसावी वस्ती आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सातवनगर येथे मोठया प्रमाणावर मटका जुगार सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी सुरू केली.

वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्यातील अवैध धंद्यांना अभय कोणाचं?

वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना नेमकं कोण अभय देतंय याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. हद्दीमध्ये खुलेआम धंद्दे सुरू असताना देखील स्थानिक पोलिस कोणामुळं त्याकडे कानाडोळा करतात हा देखील मोठा प्रश्न आहे. दरम्यान, वानवडी पोलिस ठाण्यातील ‘भाई’ आणि हडपसर पोलिस ठाण्यातील ‘भाऊ’चा आर्शिवाद हद्दीतील अवैध धंद्यांना असल्याचं तेथील इतर पोलिसांनी दबक्या आवाजत सांगितलंय. वानवडी आणि हडपसर परिसरात एवढया मोठया प्रमाणावर जुगार अड्डा सुरू असल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

एकावेळी एका अड्डयावर 12 ते 15 जण जुगार खेळतात. ते कोणालाही कसं दिसत नाही. एका ठिकाणी तर तब्बल 24 जण मटका जुगार खेळताना आढळून आले आहेत. गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर अथवा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवैध धंद्यांवर कारवाई होते. मात्र, 25-25 लोक एका-एका अड्डयावर मटका खेळत असल्याची माहिती देखील स्थानिक पोलिसांना नसते असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे.

 
अवैध धंद्यांना ‘भाई’ अन् ‘भाऊ’चे अभय?

सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या कारवाईमुळे वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्यात सध्या नेमकं काय सुरू आहे हे सर्वांसमोर आलं आहे. अशा प्रकारच्या कारवाया नेहमी होतात असं म्हणून याकडे कानाडोळा करता येणार आहे. वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापुर्वी देखील अशा मोठ-मोठया कारवाया झालेल्या आहेत. पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर बदली होती. नवीन येणार्‍या वरिष्ठांना हजार झाल्यापासुन काही ‘भाई’ आणि ‘भाऊ’ आपल्याला परिसरातील सर्वच माहिती आहे असा ‘आव’ आणून वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर एक आगळी-वेगळी ‘छाप’ पाडतात. किंबहुना जुन्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकरवी नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकास संबंधित ‘भाई’ अन् ‘भाऊ’ खुपच प्रामाणिक असल्याचं सांगितलं जातं. नवीन पोलिस निरीक्षक देखील आपलं ‘चांग भलं’ हाईल म्हणून त्यांना ‘ग्रीन सिग्नल’ देतो अन् पुढं हद्दीत अवैध धंद्दे बोकाळतात.
 
हद्दीमध्ये फिरताना आपणच पोलिस स्टेशन चालवतो असा ‘आव’ आणून ‘भाई’ आणि ‘भाऊ’ हद्दीतील सर्वच अवैध ठिकाणांवरून ‘मलिदा’ गोळा करत असतात. त्यामुळे अवैध धंद्देवाल्यांना ‘भाई’ आणि ‘भाऊ’चा उघड पाठिंबा मिळतो अन् तिथंच त्यांचा फावतं. 

 

अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा ‘भाई’ अन् ‘भाऊ’ सारख्यांवर करडी नजर

वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना कोण पाठबळ देतंय तसेच त्यांना कोण ‘ग्रीन सिग्नल’ देतंय याबाबतची माहिती अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना देखील समजली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हद्दीत थोडं काही ‘नरम-गरम’ झालं की अति वरिष्ठ पोलिस अधिकारी संबंधित अधिकार्‍याला धारेवर धरतात. वेळप्रसंगी त्यांच्यावर कारवाई देखील होते. मात्र, अशा ‘भाऊ’ आणि ‘भाई’ यांच्यामुळेच संबंधित पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी निर्धास्त राहतात. आता अशा ‘भाई’ आणि ‘भाऊ’ यांच्यावर कारवाई होणार का?, अति वरिष्ठ पोलिस अधिकारी नेमकी काय भुमिका घेणार हे पाहणे उत्सुकेचे असणार आहे.
 
आपणच पोलिस स्टेशन चालवित असल्याचा ‘आव’?

वानवडी पोलिस ठाण्यातील ‘भाई’ आणि हडपसर पोलिस ठाण्यातील ‘भाऊ’ गेल्या काही दिवसांपासुन आपणच पोलिस स्टेशन चालवित असल्याचा ‘आव’ आणतात. त्याच पध्दतीने ते हद्दीत देखील फिरत असतात. एवढेच नव्हे तर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचे त्यांच्याविना ‘पान’ देखील हालत नाही. अशीच काहीशी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासुन वानवडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे पहावयास मिळते. एखादी कामगिरी झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या बाजूला उभा असलेला फोटो देखील प्रसारमाध्यमांना दिला जातो. मात्र, दिलेल्या प्रेसनोटमध्ये त्या ‘भाई’ अन् ‘भाऊ’चं नाव देखील नसतं. होय, असं घडलंय… असो

एवढच नव्हे तर काही ‘भाई’ आणि ‘भाऊ’ चकमोगिरीमध्ये देखील पुढे आहेत. काही महिन्यांपुर्वी पोलिस आयुक्त हडपसर पोलिस ठाण्यात एका कार्यक्रमास गेले होते. त्यावेळचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. हे अति वरिष्ठा पोलिस अधिकार्‍यांना देखील माहित आहे.

सोमवारी आणि मंगळवारी नेमकं काय घडलं !

हडपसर पोलिस ठाण्यातील गोसावी वस्ती आणि वानवडी पोलिस ठाण्यातील सातवनगर येथील जुगार अड्डयांवर मोठया प्रमाणावर मटका घेतला जात असल्याची कुणकुण गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलिस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे आणि किशोर भुजबळ यांच्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापे टाकले.

गोसावी वस्ती येथे तब्बल 15 जण तर सातवनगर येथे 12 जण मटका जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली तेथून रोख 27 हजार 930 रूपये आणि 1 लाख 21 हजार रूपये किंमतीचे मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण 1 लाख 48 हजार 930 रूपयाचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी अनुक्रमे हडपसर आणि वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
 
मंगळवारी तर झाला ‘कहरच’?

सोमवारी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्डयावर मोठी कारवाई केल्यानंतर देखील मंगळवारी रेल्वे ट्रॅकजवळ एका जुगार अड्डयावर मोठया प्रमाणात मटका जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला असता तेथे तब्बल 24 जण एकाच वेळी मटका जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी कारवाई झाल्यानंतर देखील खुलेआम…

सोमवारी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार अड्डयावर गुन्हे शाखेने कारवाई केली होती. त्यानंतर देखील हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 24 जण एकाच मटका जुगार अड्डयावर जुगार खेळताना आढळून आले आहेत. त्यामुळे हडपसर परिसरात सध्या तरी खुलेआम जुगार अड्डे सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यांना कोणाचे अभय आहे हे समोर येणे आता गरजेचे आहे. याकडे अति वरिष्ठ पोलिस अधिकारी कसे पाहतात आणि कोय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, एक दिवस अगोदर कारवाई झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी हद्दीत खुलेआम धंद्दे सुरू करण्यास कोणी ग्रीन सिग्नल दिला हे देखील समोर येणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad