पुण्यातील काळेपडळ हद्दीतील हुक्का पार्लर व बारला देत होता संरक्षण, दर महिन्यात घेत होता ३० ते ४० हजार रुपये हप्ता, लाचखोरी करणार्यांना पोलीस आयुक्तांनी दिला चांगलाच धडा
पुणे माझा न्युज | प्रतिनिधी ( पुणे ) : शहरातील अवैध धंद्याविरोधात वारंवार कठोर भूमिका घेऊन ते बंद करण्यासाठी प्रयत्न करणार्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा अवैध धंद्यांना पाठबळ पुरविणार्यांना एक धडा दिला आहे. या पुढे अशा अवैध धंद्यांना सरंक्षण देऊन त्यांच्याकडून हप्ता वसुल करत असाल तर तुमची खैर नाही, असे कृतीतून सांगितले आहे. अवैध धंद्याला पाठबळ देऊन त्यांच्याकडून हप्ता घेणार्या काळेपडळ पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे. अशा प्रकारे दुसरी कारवाई करुन ‘‘आता तरी सुधारा’’ असा इशारा अशा अवैध धंद्यांना सरंक्षण देणार्या पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
शरद निवृत्ती नवले असे या निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मंहमदवाडी येथील बीबीसी रुफटॉप किचन अँड बार येथील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा व काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली होती. येथे १६ टेबलांवर ५७ तरुणतरुणी हुक्का पित असल्याचे आढळून आले होते. हुक्का पार्लरवरील ही पुण्यात सर्वात मोठी हुक्का कारवाई होती.
या हॉटेलचे मालक पार्थ अनिल वाल्हेकर याने त्याच्याकडील चौकशीत सांगितले की, एप्रिल २०२५ मध्ये हॉटेलमध्ये हुक्का विकण्यास सुरुवात केली. त्याबाबत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शरद नवले याच्याशी बोलणे झाले होते. त्याने हुक्का बार सुरु केल्याबद्दल गुडलकचे ३० हजार व एप्रिल महिन्यांचे ३० हजार रुपये असे ६० हजार रुपये १० एप्रिल २०२५ रोजी रोख स्वीकारले होते.
त्यानंतर त्यांच्या ओळखीचे हनुमंत गायकवाड पाटील यांनी हॉटेल मालक यांना १२ मे रोजी फोन करुन नवले यांनी ३० हजार रुपये पाठविण्यास सांगितले आहे, असे सांगितले. त्यांच्यामार्फत ऑनलाईन ३० हजार रुपये स्वीकारले. शरद नवले याने हॉटेल मालकाला बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन त्याबदल्यात त्याच्याकडून ९० हजार रुपये स्वीकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याने शरद नवले याला पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.
पोलीस आयुक्तांनी हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले असता तो मेसेज हुक्का पार्लर चालविणार्या हॉटेल मालकाला पाठवून सावध केल्याबद्दल यापूर्वी एका निलंबित पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर अशा प्रकारची दुसरी कारवाई करुन अवैध धंद्यांना संरक्षण देणार्याना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘आता तरी सुधारा’ असा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment