पुणे शहरात अवैध धंद्यातील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७२) याच्यावर पुणे पोलिसांनी एमपीडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे शहरात अवैध धंद्यातील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७२) याच्यावर पुणे पोलिसांनी एमपीडीए नुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. आता एक वर्षासाठी मटका व जुगार किंग कारागृहात स्थानबद्ध असणार आहे. पोलिसांच्या या कारवाईने अवैध धंद्यातील बडे-बडे मासे देखील भयभीत झाले असून, काहींनी शहराची हद्द सोडून दुसरीकडे आपला अवैध धंद्याचा संसार थाटला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
पुण्याचा मध्यभाग असलेला शुक्रवार पेठ परिसरात म्हणजेच खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत नंदू नाईक अवैधरित्या मटका, जुगार व इतर अवैध धंदे चालवत होता. पूर्ण शहरात मटका किंग म्हणून त्याची ओळख होती. पोलीस दलात देखील त्याला आदबीने बोलले जात असल्याचे अनकेजण सांगतात. त्याने अनेक अधिकाऱ्यांना केलेल्या ऑफर देखील चर्चेत आहेत. त्याच्याविरोधात खडक पोलीस स्टेशन येथे एकूण ६३ गुन्हे नोंद आहेत, त्यापैकी २०२१ पासूनच अवैध मटका आणि जुगारासंदर्भात १२ गुन्हे दाखल झालेले आहेत.
पोलिसांकडून वेळोवेळी छापे टाकून त्याच्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली होती, मात्र तरीही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्याच्या अवैध जुगार व्यवसायामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले होते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला. या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १७ मार्च २०२५ रोजी नंदकुमार नाईक याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार खडक पोलीस स्टेशनच्या पथकाने त्याला अटक करून नागपूर कारागृहात रवानगी केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपआयुक्त संदिपसिंह गिल, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केली.
मोक्कानुसारही झाली होती कारवाई
मटका किंग नंदू नाईक या नावाने तो शहर व ग्रामीण भागात ओळखला जात होता. त्याच्यावर चार वर्षांपूर्वी एका खून प्रकरणात बंडू आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई केली होती. तेव्हा नंदू नाईक याची टोळीला आर्थिक रसद पुरवत असल्यावरून मोक्का कारवाई झाली होती. मात्र नंतर हा मोक्काच न्यायालयात टिकला नाही. त्यापूर्वीच नंदू नाईकने न्यायालयातुन जामीन मिळवला होता.
नंदू नाईकचे अनेक खिस्से…
नंदू नाईक मटका किंग म्हणून जसा ओळखला जातो तसा तो राहणीमान आणि पोलीस दलात अधिकारी यांना अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी दिलेल्या ऑफरमुळे देखील फेमस आहे. केवळ बनेल आणि हाफ किंवा फुल पॅन्टवर एका मोपेड गाडीवर फिरायलेला पाहिला मिळायचा. कोट्यवधी रुपये पाळून असलेला माणूस इतका साधा राहतो, अशीही त्याची चर्चा असते. मोपेड दुचाकीला देखील एक चालक असत. तो घेऊन नंदूला फिरवत असे. काही वर्षांपूर्वी कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून त्याचा हा अवैध धंदा पूर्ण बंद ठेवला होता. त्यावेळी नंदू नाईकने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली ऑफर चर्चेत आली होती. त्याने “साहेब, मला सुरू करू द्या, तुम्हाला निळा बॅरेल भरून पैसे देतो, अशी ऑफर दिली होती”. त्यावेळी अधिकारी यांनी हासून त्याला सांगितले होते, इथून पुढं माझ्याशी संपर्क करण्याचा किंवा मी असेपर्यंत चालू करण्याचा प्रयत्न देखील करू नको. ते तुला न परवडणारे ठरेल. संबंधित अधिकारी असेपर्यंत नंदू नाईकाच्य दुकानाला टाळे होते.
अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
शहरात मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment