Pune Firecracker Sellers | पुण्यात पोलिसांची दिवाळी जोरात तर फटाका विक्रेता कोमात; फटाका विक्रेत्यांकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 26 October 2024

Pune Firecracker Sellers | पुण्यात पोलिसांची दिवाळी जोरात तर फटाका विक्रेता कोमात; फटाका विक्रेत्यांकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप

पुण्यात पोलिसांची दिवाळी जोरात तर फटाका विक्रेता कोमात; फटाका विक्रेत्यांकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे शहरातील सर्व अवैध धंदे बंद असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले होते परंतु काही वसुली बहाद्दर यांची बदली हुन देखील वसुलीला माणसे ठेऊन वसुली जोरात करत असल्याची चर्चा सुरु आहे या मध्ये प्रामुख्याने हडपसर, कोंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, या ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत अशातच दिवाळी सण जवळ आलेने दिवाळीनिमित्त फटाका विक्री व साठ्याबाबत अधिकृत परवानगी घेण्याचे आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले होते. परिपत्रकाद्वारे अधिकृत परवाना शुल्क 600 रुपये असून, हे शुल्क पोलीस उपायुक्त कार्यालयात जमा करण्याची सूचनाही त्यांनी दिली होती. त्यामुळे फटाका विक्रेत्यांनी दिलासा व्यक्त केला होता.

परंतु , पुण्याच्या पूर्व भागात पोलिसांकडून फटाका विक्रेत्यांकडून 5 ते 10 हजार रुपये वसुल केल्याचे प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशालाच पोलिसांनी पायाखाली तुडवले असल्याच्या चर्चेला जोर धरला आहे.


पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत 39 पोलीस ठाण्यांमध्ये 4,000 हून अधिक फटाका स्टॉल आहेत. एका स्टॉलकडून 10 हजार रुपये प्रमाणे वसुली केल्यास सुमारे 4 कोटींची रोकड जमा होणार आहे. नागरिकांनी याविषयी आश्चर्य व्यक्त करत चर्चा सुरु केली आहे की, अधिकृत शुल्का व्यतिरिक्त एवढी रक्कम गोळा करण्यामागचं काय उद्देश आणि कारण असेल ?

पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची "जबरन वसुली"...
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फटाका विक्रेत्यांची कागदपत्रे वैध असल्याने त्यांना परवाने दिले आहेत. मात्र, पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना फटाका स्टॉलकडून सरसकट पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिले आहे. काही ठिकाणी ५ हजार, 7 हजार, तर काही ठिकाणी 10 हजार उकळण्यात आले आहेत. तसेच हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी दबावसुद्धा आणला जात आहे. याचा फटका विक्रेत्यांना बसत आहे. पोलिसांकडून त्यांची लुट केली जात आहे. या वसुलीमुळे फटाका विक्रेते व पोलिसांमध्ये वादावादी होत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा जिद्दीपणा पोलिस कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला महागात पडत असल्याची चर्चा पोलीस दलात दबक्या आवाजात सुरु आहे.


पैसा कोणाच्या खिशात ?
विक्रेत्यांनी रीतसर परवानगी मिळून देखील पोलीस प्रशासन सर्वांकडून का उकळत आहे पैसे ? ही रक्कम कोणाच्या तिजोरीत जमा होणार ? ही वसुली कशासाठी व कोणासाठी ? याचे गौडबंगाल अजूनही समजलेले नाही. त्यामुळे एवढी गोळा केलेली मलाई जाणार कोठे ? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुपितच.

अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई होणार?
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशाला पुण्याच्या पूर्व भागात पोलिसांनी केराची टोपली दाखवून बळजबरीने वसुली सुरु केली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक स्टॉल धारकांकडून पैसे उकळले  जात आहे. विक्रेते देखील पोलिसांच्या भीतीने पैसे देत आहेत. मात्र, अधिकृत परवानगी घेतली असतानाही पैसे उकळण्याचा प्रकार कशासाठी सुरु हे अद्याप समजले नाही ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शासकीय शुल्का व्यतिरिक्त अनधिकृत पैसे गोळा करण्यास सांगितले आहे, त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार ? याकडेही सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

ऐन दिवाळीत फटाका विक्रेत्यांचा दिवाळा .. !
दिवाळी सणानिमित्त फटाका स्टॉल लावून आपली दिवाळी गोड करू, असा मानस व्यक्त करून काही विक्रेते फटाका स्टॉल लावत आहे. या स्टॉलसाठी विक्रेते मागील 10 दिवसांपासून ग्रामपंचायत, एमएसईबी, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेत आहेत. याबरोबरच चरित्र पडताळणी, हमीपत्र, आधारकार्ड व विविध कागदपत्रे गोळा करून पोलीस उपायुक्त कार्यालयात अर्ज करीत आहे. त्यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरुपात फटाके विकण्यासाठी परवानगी मिळत आहे. यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल इतकाच पैसा गोळा होणार आहे. मात्र, त्यातूनही पोलिसांकडून ५ ते १० हजार उकळले जात आहे. यामुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मालामाल होणार आहेत. मात्र, त्याची आर्थिक झळ विक्रेत्यांना बसत आहे. ज्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad