पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे डेबीटकार्ड हातचलाखीने घेऊन वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ही कारवाई 1 ऑक्टोबर रोजी विश्रांतवाडी येथील सारस्वत बँकेच्या एटीएमजवळ करण्यात आली.
मयंककुमार संतराम सोनकर (वय-27 रा. द्वारका संकुल पार्टमेंट, परांडेनगर, धानोरी, पुणे, मुळ गाव मु.पो. मोहादा, जि. हमीपुर, उत्तर प्रदेश), कपिल राजाराम वर्मा (वय-30 रा. परांडेनगर, धानोरी, पुणे मुळ गाव मु.पो. बडनी जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्य़ादी हे 22 सप्टेंबर रोजी विश्रांतवाडी चौकातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी हातचलाखीने फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेले बँकेचे डेबीट कार्ड चोरले. या डेबीटकार्डद्वारे आरोपींनी वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून रोख रक्कम तसेच काही वस्तु खरेदी करुन फिर्य़ादी यांची 87 हजार 580 रुपयांची फसवणूक केली होती. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा दाखल आहे.
आरोपींची अंगझडती घेतली असता सोनकर याच्या पँन्टच्या खिशामध्ये वेगवेगळ्या बँकेची 16 डेबिट कार्ड व दाखल गुन्ह्यातील फिर्य़ादी यांच्या पत्नीचे डेबिट कार्ड तसेच 4500 रुपये मिळाले. तर दुसरा आरोपी वर्मा याच्या पँटच्या खिशातून 9 डेबिट कार्ड मिळाले. आरोपींकडे डेबिट कार्ड बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत देखील त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलिसांनी डेबीट कार्ड आणि दुचाकी जप्त केली आहे. आरोपींनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडून फिर्यादी यांच्या एटीएम कार्डद्वारे खरेदी केलेले 6.9 ग्रॅम वजनाचे 45 हजार रुपयांचे सोने, 49 हजार 700 रुपये रोख, 50 हजार रुपयांची मोटारसायकल तसेच वेगवेगळ्या बँकांचे 62 डेबिट कार्ड जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 शशीकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण, पोलीस अंमलदार चव्हाण, भोसले, मोरे, देवकाते, खराडे व पिसाळ यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment