Anti-corruption News | येरवडा पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल; - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Tuesday, 13 June 2023

Anti-corruption News | येरवडा पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल;

येरवडा पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल

 

 

पुणे माझा न्युज । प्रतिनिधी - नागेश देडे : येरवडा पोलिस स्टेशनमधील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. कारला झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेणार्‍या पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याला सहाय्य करणार्‍या अन्य दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्याचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार जयराम सावलकर आणि पोलीस हवालदार विनायक मुधोळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तिघा पोलीस हवालदारांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर सोमवारी त्याची पडताळणी केली. त्यात त्यांनी तडजोड करुन 13 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. रात्री उशिरापर्यंत पोलीस नजर ठेवून होते. पोलिसांनी तक्रारदार याची तक्रार मध्यरात्रीनंतर दाखल करुन घेतली. त्यानंतर हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदाराकडून 13 हजार रुपये स्वीकारले. तसा इशारा तक्रारदाराने केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दीक्षित याला ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत साळुंखे मुकुंद आयाचित, पोलीस शिपाई भूषण ठाकूर, पांडुरंग माळी यांनी ही कारवाई केली.
 
येरवडा पोलिस स्टेशनमधील खाबुगिरी चव्हाटयावर आली आहे. एकाचवेळी 3 पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या ट्रॅपमध्ये सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनने एकाला अटक केली असून त्यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी लाचेची मागणी होत असल्याचे समोर आल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. येरवडा पोलिस स्टेशनमध्ये नेमकं काय चाललंय हे या प्रकारावरून समोर आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad