अवैध धंद्यांबाबत DG कंट्रोलकडून शहर नियंत्रण कक्षात ‘कॉल’ पोलिस आयुक्तांचे ‘क्रॉस रेड’ करण्याचे उपायुक्तांना आदेश
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी पुणे : पुणे शहर आणि परिसरातील मटका, जुगार अड्डे आणि गावठी दारू धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासंदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यापुर्वी वेळावेळी सर्वच पोलिस स्टेशनच्या प्रभारी पोलिस निरीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना आदेश दिलेले आहेत. तरी देखील काही ठिकाणी अशा प्रकारचे अवैध धंद्दे सुरू असल्याबाबतचे कॉल पोलिस महासंचालक नियंत्रण कक्षाकडून शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षास वेळोवेळी येत आहेत.
त्यामुळे अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ‘क्रॉस रेड’ करण्याचे आदेशच पोलिस आयुक्त आणि सह पोलिस आयुक्तांनी गुरूवारी पोलिस आयुक्तालयात झालेल्या गुन्हे विषयक आढावा बैठकीत दिले आहेत. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास असमर्थ ठरणार्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त पोलिस उपायुक्त आणि वेळ पडल्यास अप्पर पोलिस आयुक्तांवर कारवाई करण्याबाबतचे सूतोवाच देखील पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी बैठकीदरम्यान केले आहे.
शहरातील काही ठिकाणी मटका, जुगार अड्डे आणि गावठी दारू धंद्दे सुरू असल्याबाबतचे कॉल डीजी कंट्रोलकडून शहर नियंत्रण कक्षाला प्राप्त होत आहेत. ही गोष्टी अशोभनीय आहे. त्यामुळे सर्वच पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे अवैध धंद्ये शहरात चालु राहू नयेत यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस उपायुक्तांनी ‘क्रॉस रेड’ कराव्यात. पोलिस उपायुक्तांनी झोनच्या बाहेरील पोलिसांना बोलावून अवैध धंद्यांवर कारवाई करावी असे स्पष्ट निर्देशच पोलिस आयुक्तांनी गुन्हे विषयक आढावा बैठकीत दिले आहे.
लोणी काळभोर, वारजे माळवाडी, उत्तमनगर, खडकीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना झापले
प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास असमर्थ ठरणार्या लोणी कोळभोर वारजे माळवाडी उत्तमनगर आणि खडकीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी चांगलेच धारेवर धरले. संबंधित अधिकार्यांना बैठकीदरम्यान उभा राहून याबाबत विचारणा देखील केली. लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका महिलाचा खून झाला होता. तो खून येरवडा कारागृहात नुकताच बाहेर पडलेल्या एकाने केला होता. पोलिसांनी त्याच्याविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई केली नव्हती.
वारजे माळवाडीच्या हद्दीतील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी उत्तमनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. त्यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी उत्तमनगर आणि वारजे माळवाडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना त्याचा जाब विचारला. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी हद्दीचा वाद घालत बसण्यापेक्षा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी नेमकी काय पावले उचलली याबाबत त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. खडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीत देखील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. तेथे देखील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई झालेली नसल्याचे समोर आल्यानंतर खडकीच्या पोलिस निरीक्षकांकडे देखील याबाबत विचारणा करण्यात आली आहे.
असमर्थ ठरणार्या अधिकाऱ्यावर करणार कारवाई – पोलिस आयुक्त
प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास असमर्थ ठरणार्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर आयुक्तांनी प्रतिबंधात्मक कारवाई आणि त्याचा पाठपुरावा करण्याबाबाबत असमर्थ ठरणार्या सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्तांवर देखील कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. वेळ पडल्यास अप्पर पोलिस आयुक्तांवर देखील कारवाई केली जाईल असे सूतोवाच पोलिस आयुक्तांनी यावेळी केली.
110 मध्ये बॉन्ड न घेता गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवा – पोलिस आयुक्त
सराईत गुन्हेगारांना वर्षभरातून एकदा तरी काही दिवसांसाठी जेलमध्ये पाठवा. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल.सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्याच्याकडून बॉन्ड न घेता त्याला एमसीआरमध्ये जेलमध्ये पाठवा अशी सूचना पोलिस आयुक्तांनी पोलिस अधिकार्यांना केली आहे. पोलिस आयुक्तांनी केलेल्या सूचनेची अंमलबजावणी संबंधित पोलिस अधिकार्यांनी केली असती तर लोणी काळभोर, उत्तमनगर आणि खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी घटना टाळल्या असत्या.
हद्दीचा वाद न ठेवता समन्वय ठेवावा
हद्दीचा वाद न घालता पोलिस अधिकार्यांनी समन्वय ठेवावा. संबंधित गुन्हेगारांवर प्रतिंधात्मक कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.पोलिस स्टेशनच्या हद्दीत खून, खूनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी उपाय योजना आखाव्यात अशा सूचना देखील बैठकीत देण्यात आल्या. खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर घटनांना प्रतिबंधात्मक कारवाई केल्यास नक्कीच आवर बसणार आहे.
No comments:
Post a Comment