Breaking News | कोंढवा खंडणी प्रकरण: सोसायटीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश टाळण्यासाठी अध्यक्षाने सभासदांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 24 October 2025

Breaking News | कोंढवा खंडणी प्रकरण: सोसायटीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश टाळण्यासाठी अध्यक्षाने सभासदांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा

कोंढवा खंडणी प्रकरण: सोसायटीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश टाळण्यासाठी अध्यक्षाने सभासदांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपींचा दावा

पुणे माझा न्युज ( प्रितिनिधी ) पुणे: कोंढवा येथील कौसरबाग सोसायटीतील अतिक्रमण कारवाई आणि खंडणीच्या आरोपांबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याला आता नवे वळण मिळाले आहे. सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष तौसिफ महमंद इसाक शेख (वय ३९) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीविरुद्ध आरोपी जुबेर मोमीन (रा. कोंढवा खुर्द) आणि झिया शेख (रा. भवानी पेठ) यांनी हा गुन्हा खोटा असून, सोसायटीतील आर्थिक घोटाळा लपवण्यासाठी रचलेला कट असल्याचा ठाम दावा केला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल या प्रकरणाच्या चौकशीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, झिया शेख हे सोसायटीचे सभासद असून, जुबेर मोमीन हे कौसरबाग सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत. जुबेर यांनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावर न्यायालयात अनेक खटले लढले असून, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली. या कारवाईदरम्यान, तौसिफ शेख यांनी बेकायदेशीर जमाव जमवून अडथळा निर्माण केला आणि सभासदांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याच रागातून तौसिफ शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जुबेर मोमीन आणि झिया शेख यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे.

सभासदांच्या म्हणण्यानुसार, "हे खंडणीचे प्रकरण नसून, सोसायटीतील बेकायदेशीर अतिक्रमण आणि आर्थिक घोटाळ्याचा मुद्दा उघडकीस येऊ नये म्हणून रचलेला डाव आहे. १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान सोसायटी कार्यालयात झालेली चर्चा अतिक्रमण कारवाई टाळण्याच्या सूचनांबाबत होती. तौसिफ शेख यांनीच आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि पोलिसांची दिशाभूल करून खोटी तक्रार दाखल केली. निवडणुकीत आम्ही त्यांना साथ दिली नाही, म्हणून त्यांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही कधीच ५ लाख रुपये किंवा महिन्याला ५० हजार रुपये हफ्त्याची मागणी केलेली नाही." 

सभासदांनी असा दावा केला आहे की, सोसायटीच्या काही कमिटी सभासदांनी आर्थिक घोटाळा आणि अतिक्रमण लपवण्यासाठी महानगरपालिकेकडे तक्रार टाळण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी न्यायालयात स्थगिती मिळवली होती, परंतु कमिटीने खुलासा सादर न केल्याने न्यायालयाने स्थगिती उठवत कारवाईचे आदेश दिले. या कारवाईमुळे कमिटीच्या आर्थिक लाभाला धक्का बसल्याने खोटा गुन्हा दाखल केला गेला, असा जुबेर मोमीन यांचा दावा आहे. 

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.facebook.com/share/v/1FDyX7Db9B/

सोसायटीच्या काही सभासदांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया देताना सांगितले की, "निवडणुकीनंतर अध्यक्षपद मिळाल्यापासून तौसिफ शेख यांच्या वागणुकीत बदल झाला आहे. ते विरोधकांना लक्ष्य करत आहेत. खंडणीचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. १५ ऑक्टोबरला झालेली अतिक्रमण कारवाई ही न्यायालयाच्या आदेशानुसार झाली, ज्यामुळे सोसायटीतील अनधिकृत बांधकाम हटवले गेले. कारवाईदरम्यान तौसिफ शेख यांनीच शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो आम्ही पोलिसांना पुरावा म्हणून सादर करू."

कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याची (IPC कलम ३८६ - खंडणी आणि धमकी) चौकशी सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात करत आहेत. आरोपींनी न्यायालयात पुरावे सादर करून तौसिफ शेख यांच्यावर खोटी तक्रार आणि बदनामीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. "सोसायटीतील आर्थिक घोटाळ्याचे पुरावे आमच्याकडे असून, ते पोलिस आणि न्यायालयासमोर सादर करू. सत्य लवकरच समोर येईल," असे झिया शेख यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांबाबत काही सभासदांनी तयार केलेले व्हिडिओ पुरावे असल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण सोसायटीतील अंतर्गत राजकारण आणि अतिक्रमणाच्या जटिलतेचा दाखला ठरले आहे. पोलिस तपासात सत्य उघड होईल, याची सर्वांना उत्सुकता आहे.

 संबधित व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.youtube.com/watch?v=kwfBf0Qvktg

https://www.youtube.com/watch?v=sZOwLtDUQOg 

https://www.youtube.com/watch?v=jelLsRGrFcU

No comments:

Post a Comment

Post Top Ad