पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : हल्लीची पत्रकारिता मोठ्या विचित्र अशा वळणावर आहे. या पत्रकारितेत डिजिटलायझेशन जास्त दिसत आहे. सामाजिक बांधिलकी, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची तळमळ, भ्रष्टाचाराची चीड, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्यांविषयीचा संताप आणि खर्याला खरं म्हणण्याची धमक अजिबात दिसत नाही. पाकीट मिळालं, की काम संपलं. मग पत्रकारिता गेली उडत, अशी परिस्थिती हल्ली पाहायला मिळत आहे. पुण्यातील एका व्यावसायिकाला व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या पुण्यातील दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 13 जुलै 2023 दरम्यान घडला आहे.
याबाबत विलास गुलाबराव देशमुख (वय-64 रा. वडगावशेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदय पोवार (वय-40 रा. कर्मभुमीनगर, लोहगाव, पुणे ), त्या सोबत आणखी एक पत्रकार ( रा. विश्रांतवाडी ) यांच्यावर आयपीसी 383, 499, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उदय पोवार हा पुण्यातील एका दैनिकात पत्रकार म्हणून काम करतो. तर दुसरा पत्रकार हा युट्युब चॅनेल चालवत आहे. आरोपींनी वडगावशेरी येथील पंपींग स्टेशन येथे फिर्यादी यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्यांनी फिर्यादी यांच्याकडून आतापर्य़ंत 25 हजार रुपये रोख आणि 5 हजार रुपये युपीआय द्वारे असे एकूण 30 हजार रुपये घेतले आहेत.आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पुन्हा खंडणीची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर यूट्यूबच्या पत्रकाराने फिर्यादी यांचा चालक राजाराम मधोळकर यांच्या फोनवर फोन करुन फिर्यादी यांना व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देली.
आरोपींनी खोटी बातमी दाखवली. तसेच वृत्तपत्रामध्ये 14 जुलै रोजी वृत्त देऊन फिर्यादी यांची खोटी बदनामी केली. याबाबत फिर्यादी यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानुसार सीआरपीसी कलम 156(3) नुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड करीत आहेत.
No comments:
Post a Comment