कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 4 September 2020

कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेन्मेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या दूरदृश्य बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी विशेषत: मुंबईमधील प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केले मात्र राज्यातील कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांनी अधिक परिणामकारक उपाय योजावेत असे सांगितले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे त्याचप्रमणे टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित हे देखील सहभागी होते.

आरोग्यमंत्र्यांनी देखील यावेळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सूचना केल्या तसेच प्लाझ्मा थेरपीविषयीही सांगितले.  

रुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर

खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स राखीव न ठेवणे आणि रुग्णांच्याकडून अव्वाच्या सव्वा खर्च घेण्याच्या तक्रारी येत आहेत ही गंभीर गोष्ट आहे. जिल्हा प्रशासन आणि पालिकांनी याला तातडीने चाप लावला पाहिजे व योग्य ती कडक कारवाई लगेच केली पाहिजे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बेड्स आणि रुग्णवाहिका नियोजन हा महत्त्वाचा भाग आहे, याकडेही खूप काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रमुख शहरांमध्येही जम्बो सुविधा

मुख्यमंत्री म्हणाले, धारावी आणि वरळी येथील प्रादुर्भाव रोखण्यात आला त्यावेळी तर सध्या उपयोगात आणणारी विशेष औषधेही उपचारासाठी देण्यात येत नव्हती. उपलब्ध वैद्यकीय साधन सुविधांचे उत्तम नियोजन करून ही साथ या भागात आटोक्यात आणण्यात आली. मुंबईमध्ये जशा जम्बो सुविधा उभारण्यात आल्या आहेत तशाच राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये देखील उभारण्यास प्राधान्य देण्यात आले असून यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यावर भर आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव विशेषत: डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरत आहे तो रोखणे खूप गरजेचे आहे.या आरोग्य सेवकांना संरक्षित करणे व त्यासाठी त्यांना तशा स्वरूपाचे प्रशिक्षण द्यावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आजमितीस व्हेंटिलेटरवर खूप कमी संख्येने रुग्ण आहेत, त्यांना सर्वात जास्त गरज असते ती ऑक्सिजनची.

महाराष्ट्रात कुणीही गाफील राहू नका. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पसरणार नाही तसेच दुसरी लाट येणार नाही याकडे लक्ष द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad