गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 4 September 2020

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


'वर्क फ्रॉम होम' मध्येही हातभार लावण्याचे गुगलला केले आवाहन

मुंबई, दि. ६ : सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, जी स्वीट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.

वर्क फ्रॉम होमसाठी सहकार्य करावे - मुख्यमंत्री

जे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, गुगलमुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल स्वीट च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की गुगलच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास यामुळे मदत होईल.

गुगल आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक - उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी जी स्वीट  आणि राज्य शाळांकरिता गुगल क्लास रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.  गुगल क्लासरुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात,

कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येला संधीत रुपांतर करुन डिजिटल क्रांतीचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांना याचा उपयोग करुन घेता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण यामुळे मिळण्याची सोय झाली आहे, असेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

शिक्षणातील अग्रेसर राज्य बनविणार - शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन,ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad