आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ससून रुग्णालयास भेट ससून रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे दिले आदेश - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Monday, 21 September 2020

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ससून रुग्णालयास भेट ससून रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे दिले आदेश

पुणे माझा न्युज: दि.20/09/2020 ससून रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे, असे सांगून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी येथील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाला आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट देऊन कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त तथा ससूनचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता अमोल पवार, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय तावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

ससूनच्या कोविड रुग्णालयासंदर्भात माहिती घेताना आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोविड-19 बाधितांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ससून बरोबरच सर्व खाजगी रुग्णालयांनी ऑक्सीजन व व्हेंटीलेटरयुक्त  बेडची संख्या वाढवावी. तसेच खाजगी रुग्णालयांनी 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.  ससून रुग्णालयाला ऑक्सीजनचा तुटवडा भासू नये यासाठी ऑक्सीजनची टाकी बसवावी तसेच या अनुषंगाने सुरु असणारी कामे जलदगतीने पूर्ण करावीत. राज्यातील इतर जिल्हयांमधील तसेच पुण्यातील अन्य रुग्णालयातील  रुग्णांना 'टेलिमेडिसीनव्दारे' उपचार करण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा. कोविडच्या चाचण्या लवकरात लवकर होण्यासाठीचे किट माफक दरात पुरविण्यासाठी या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन  प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

  कोरोनाच्या रुग्णांना आरोग्याच्या सेवा-सुविधा चांगल्या प्रकारे मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून ससून रुग्णालयाला आवश्यक औषधांचा साठा व साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यात येईल. कोरोनाचा वाढत जाणारा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनीही दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच  सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी केले.

वैद्यकीय सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे यांनी रुग्णांवरील उपचारासाठी बेड व्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगितले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी  'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'  मोहिमेव्दारे घरोघरी सर्वेक्षणावर भर देवून नागरिकांना तात्काळ उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.

  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी खाजगी रुग्णालयांच्या अवाजवी शुल्क नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. ससूनचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम व अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांनी ससून रुग्णालयातील उपलब्ध बेड, मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी यांचे डयुटी नियोजन, दैनंदिन भरती होणारे  कोविड व नॉन कोविड रुग्ण व देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती दिली. उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारपध्दतीबाबत माहिती देवून सूचना केल्या. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad