लातूर येथून खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला गुन्हे शाखा युनिट ५ ने केले जेरबंद
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी पुणे: फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत १० मे २०२५ रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृत व्यक्तीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळल्या. तपासाअंती मृताचे नाव हनिफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे) असे असल्याचे समजले. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. कलम १०३ अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. ९२/२०२५) नोंदवण्यात आला.
वरिष्ठांच्या आदेशानुसार, पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ५ आणि ६ ने समांतर तपास सुरू केला. तीन दिवस अहोरात्र तपास, तांत्रिक विश्लेषण आणि ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी आसिफ युनूस शेख (वय २५, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) याने हा खून केल्याचे उघड झाले. गुन्हा घडल्यानंतर तो आपल्या मूळ गावी, शास्त्रीनगर, लातूर येथे पळून गेल्याची माहिती मिळाली.
१३ मे २०२५ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर येथे जाऊन आरोपी आसिफला ताब्यात घेतले. पुण्यातील गुन्हे शाखेच्या युनिट ५ कार्यालयात सखोल चौकशी केली असता, जुन्या वैमनस्यातून आरोपीने मृत हनिफ शेख याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला पुढील तपासासाठी फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, पोलीस अंमलदार शेखर काटे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे (युनिट ६) तसेच स. फौजदार राजस शेख, पोलीस हवालदार तानाजी देशमुख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, विनोद निंभोरे, अकबर शेख, अमीत कांबळे आणि संजय दळवी (युनिट ५) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुणे गुन्हे शाखेच्या या तत्परतेमुळे खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या तीन दिवसांत जेरबंद करण्यात यश मिळाले
No comments:
Post a Comment